नागपूर दिनांक 6फेब्रुवारी 2023:- विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावून नागपूरचा नावलौकिक वाढविणाऱ्या मान्यवरांना १४ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता महाल येथील सिनिअर भोसला पॅलेसमध्ये राजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती राजरत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकारीतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल दै सामनाचे ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव यांना राजरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
राजरत्न पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राहतील. कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उईके राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत राजे रघुजी भोसले (पंचम) यांची उपस्थिती राहणार आहे. राजरत्न पुरस्कारात पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी महेश उपदेव यांना श्रीमंत राजे रघुजी भोसले (प्रथम) स्मृती पुरस्कार, साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ज्येष्ठ समीक्षक वि. स. जोग यांना श्रीमंत राजे मुधोजी महाराज ऊर्फ आप्पासाहेब भोसले (द्वितीय) स्मृती पुरस्कार, क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी गिरीष उपाध्याय यांना श्रीमंत राजे बहादूर रघुजी महाराज भोसले (चतुर्थ) स्मृती पुरस्कार, संगीत व वादन क्षेत्रातील नरेंद्रनाथ मेनन यांना श्रीमंत राजे बहादूर फत्तेसिंह महाराज भोसले स्मृती पुरस्कार, विशेष कार्यासाठी अनिल पालकर यांना श्रीमंत राजे बहादूर अजितसिंह महाराज भोसले स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. १८ वर्षाखालील क्रीडा क्षेत्रातील हितवी विनय शाह यांना श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज भोसले स्मृती पुरस्कार तसेच विशेष कार्यासाठी मृदुल मोहन घनोटे यांना श्रीमंत महाराणा प्रताप स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेला सागर खादीवाला, गायक एम. ए. कादर आदी उपस्थित होते.(दि.6फेब्रुवारी 2023)