नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

कुष्ठरोगावरील जिल्हा धोरणात्मक कृती आराखडाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विमोचन

नागपूर जिल्हयाचा धोरणात्मक कृती आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्याचे विमोचन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या हस्ते

नागपूर,दि.3 ऑक्टोंबर 2023: - राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केन्द्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार जिल्हास्तरावर कुष्ठरोगाचे दुरीकरण सन 2025 पर्यंत व तालुकास्तरावर कुष्ठरोगाचे दुरीकरण सन 2027 पर्यंत साध्य करणे तसेच शून्य कुष्ठरोग संसर्ग हे उद्दीष्ट लक्षात घेवून नागपूर जिल्हयाचा धोरणात्मक कृती आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्याचे विमोचन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शनात सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) यांनी धोरणात्मक कृती आराखडा तयार केला असून त्याचे विमोचन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आज करण्यात आले. यावेळी सार्वजनिक आरोग्य संस्थेचे संचालक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. श्रीराम गोगुलवार, मनपाचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. बहीरवार, कुष्ठरोग प्रशिक्षण केंद्राचे सहाय्यक संचालक डॉ. कन्नमवार, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. भाग्यश्री त्रिवेदी उपस्थित होते. जिल्हयात राबविण्यात येणाऱ्या कुष्ठरोग कार्यक्रमास मदत करण्यात येईल, असे डॉ. इटनकर यांनी जाहीर केले. जिल्हयाचा आरोग्य विषयक धोरणात्मक कृती आराखडा बनत असताना सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) कार्यालयाने कुष्ठरोगाबद्दल कृती आराखडा सर्वप्रथम तयार केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी
कुष्ठरोग विभागाचे कौतुक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी जिल्हयातील सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) कार्यालयाच्या संपूर्ण टिमचे आतापर्यंत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल अभिनंदन केले व जिल्हयात कुष्ठरोग कार्यक्रमाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहीती देवून कुष्ठरोग कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत सूचना दिल्या. या कार्यक्रमात सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात येवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिपिका साकोरे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) यांनी केले. याप्रसंगी आरोग्य सेवेच्या उपसंचालक डॉ. कांचन वानेरे यांनी मंडळातील कुष्ठरोगाबाबतची माहीती दिली. तसेच सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेली कुसुम (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) या कार्यक्रमाची चित्रफीत दाखविण्यात आली.