नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

विकसित भारत निर्मितीत संस्कृत तज्ञ आणि विश्वविद्यालयांची भूमिका महत्त्वपूर्ण – श्री चमू कृष्ण शास्त्री - त्रयोदश दीक्षांत समारंभ

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा त्रयोदश दीक्षांत समारंभ ,रामटेक येथे संपन्न

नागपूर /रामटेक दि. 16 एप्रिल 2025:-कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा त्रयोदश दीक्षांत समारंभ बुधवार, दि. 16 एप्रिल रोजी सकाळी 11ः00 वाजता कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक येथे संपन्न झाला. विश्वविद्यालयाचे कुलगुरू मा. प्रो. हरेराम त्रिपाठी हे दीक्षांत समारोहाच्या अध्यक्षस्थानी होते. समारोहात प्रमुख अतिथी या नात्याने प्रसिद्ध संस्कृत विद्वान् संस्कृत भारतीचे संस्थापक पद्मश्री मा. श्री चमू कृष्ण शास्त्री, अध्यक्ष, भारतीय भाषा समिती, उच्च शिक्षा विभाग, केंद्र सरकार उपस्थित होते. व्यवस्थापन परिषद सदस्य आणि शिक्षक आमदार श्री सुधाकर अडबाले तसेच विश्वविद्यालयाचे कुलसचिव मा. डाॅ. देवानंद शुक्ल, परीक्षा नियंत्रक मा. डाॅ. केशव मोहरीर, व्यवस्थापन परिषद, विद्वत् परिषदेचे सदस्य, सर्व संकायांचे अधिष्ठाता आणि पदकदान-दाते याप्रसंगी विशेषत्वाने उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रगीताने झाला. विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी यांनी मा. श्री चमू कृष्ण शास्त्री यांचे स्वागत व सत्कार केला. विश्वविद्यालयाच्या शिक्षणशास्त्र संकायाच्या अधिष्ठाता प्रो ललिता चंद्रात्रे यांनी आपल्या स्वागतपर भाषणात विश्वविद्यालयाचा विकास व प्रगतीविषयक अहवाल सादर केला. विश्वविद्यालयाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा पूर्णपणे अंगिकार केला असून, भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित अभ्यासक्रमांचे परिचालनही केले आहे. विश्वविद्यालयाचे लक्ष्य आता वारंगा येथे आंतरराष्ट्रीय केंद्र लवकरात लवकर परिचालित व्हावे हेच आहे. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक कराराद्वारे अनेकानेक आंतरशाखीय संशोधन व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विश्वविद्यालयाच्या विकासात मा. राज्यपालमहोदयांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन तसेच महाराष्ट्र शासनासह सर्वांचे सहकार्य लाभत आहे त्यासाठी मी सर्वांची ऋणी आहे. या दीक्षांत समारोहात विश्वविद्यालयाचे कुलगुरू मा. प्रो हरेराम त्रिपाठी यांनी विद्यार्थ्यांना दीक्षांतोपदेश प्रदान केला. मा कुलगुरू महोदयांनी या दीक्षांत समारोहात 2023-24 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विशिष्ट अतिथी श्री चमू कृष्ण शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत 2756 पदव्युत्तर पदवी, 4228 पदवी, 1367 पदविका, 109 पदव्युत्तर पदविका, व 97 प्रमाणपत्रासह मुक्त स्वाध्यायपीठम् द्वारा 278 पदव्युत्तर पदवी, पदविका व प्रमाणपत्र अशी एकूण 8854 पदवी प्रमाणपत्रे प्रदान केली. 35 हून अधिक विषयांमध्ये 50 सुवर्ण पदकांसह 14 रोख पारितोषिके देखील या दीक्षांत समारोहात प्रदान करण्यात आली. तसेच याप्रसंगी 19 विद्यार्थ्यांना विविध विद्याशाखा अंतर्गत विद्यावारिधी (पीएच्.डी.) पदवीने गौरवान्वित करण्यात आले. प्रमुख अतिथी पद्मश्री मा. श्री चमू कृष्ण शास्त्री यांनी आपल्या भाषणाद्वारे विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले. मा. चमू कृष्ण शास्त्री महोदयांनी प्रारंभी सर्व पदवी तसेच पीएच्.डी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. आपल्या भाषणात मा. श्री चमू कृष्ण शास्त्री म्हणाले, विकसित भारत निर्मितीत संस्कृत तज्ञ आणि विश्वविद्यालयांची मोठी भूमिका आहे. भारताची नवनिर्मिती ही भारतीय तत्त्वांवर आधारित असली पाहिजे. त्यासाठी संस्कृत भाषेची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मेकॉले शिक्षण पद्धतीचा प्रभाव दूर करून भारतीय ज्ञानाधारित नवी शिक्षण व्यवस्था केंद्र सरकार निर्माण करीत आहे. यासाठी विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्यामध्ये भारतीय भाषा, भारतीय दृष्टी, भारतीय विचार देणारी शिक्षण पद्धतीचा स्वीकार , त्यानुसार भारतीय ज्ञान परंपरा आधारित भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तकांची निर्मिती, भारतीय भाषांमध्ये विविध प्राचीन ज्ञानाधारित संशोधनाला प्रोत्साहन, वैज्ञानिक आणि तांत्रिक शब्दांचा 22 भाषांमध्ये अनुवादाद्वारे नवशब्दनिर्मिती आणि पांडुलिपी संरक्षण संवर्धन यांचा समावेश आहे. या प्रकल्पां मध्ये संस्कृत तज्ञ आणि संस्कृत विश्वविद्यालये आपले योगदान देवू शकतात. आधुनिक विज्ञानाधारित पाठ्यपुस्तके हे प्राचीन विशिष्ट विज्ञानाचा इतिहास, भूमिका आणि वैश्विक चिंतन देणारी असली पाहिजे तरच आपण भारतीय तत्त्वांवर आधारित भारतीय शिक्षण पद्धती रुजविण्यात यशस्वी होऊ. अध्यक्षीय भाषणात मा कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी यांनी सर्व पारितोषिक व पदक प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तुम्ही सर्व विद्यार्थी भारताचे भविष्य आहात. येथून पुढे संस्कृतची, राष्ट्राची सेवा करा. आपल्या ज्ञानाचा उपयोग देशसेवेसाठी करा. कालिदास संस्कृत विश्वविद्यालय हे शास्त्ररक्षा, शास्त्रसंवर्धन निरंतर करीत असून आज याचीच फळे विद्यार्थ्यांच्या रूपाने दिसून येत आहेत. विश्वविद्यालयाची ही उपलब्धी आहे.केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याकडून सातत्याने सर्वतोपरी सहाय्य मिळत असतेच आणि विश्वविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मयोगी यांच्या निरंतर सेवेने आणि कर्तृत्त्वाने विद्यापीठ यशाची शिखरे सर करीत आहेत. मा प्रमुख अतिथी श्री चमू कृष्ण शास्त्री यांच्या मार्गदर्शनाने आम्ही उपकृत झालो आहोत. विश्वविद्यालय संस्कृतसेवेसाठी कायमच कटिबद्ध आहे अशी ग्वाही मा कुलगुरू महोदयांनी दिली. विश्वविद्यालयातर्फे शोधसंहिता, भारतीय दिनदर्शिका वैदर्भी आणि दोन ग्रंथांचे प्रकाशन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे युजीसी केअर लिस्टेड संशोधन जर्नल शोधसंहिता, वार्तापत्रिका वैदर्भी, वेदांग ज्योतिष विभागातर्फे तर्यार करण्यात आलेल्या भारतीय दिनदर्शिके चे प्रकाशन या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच प्राचीन भारतीय विज्ञान आणि मानव्यशास्त्रे संकायाचे अधिष्ठाता प्रो कृष्णकुमार पांडेय यांच्या जातकालंकार ग्रंथाचे आणि शिक्षणशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापिका डॉ राजश्री मेश्राम यांच्या अध्ययन अध्यापनातील मूल्यमापन व शिक्षणातील नवीन प्रवाह’ या ग्रंथाचे प्रकाशनही याप्रसंगी करण्यात आले. दीक्षान्त समारोहाचे संचालन डाॅ. सुमित कठाळे यांनी केले. प्रकाशन समारोहाचे संचालन डॉ रेणुका बोकारे यांनी केले राष्ट्रगीताने दीक्षांत समारोहाची समाप्ती झाली. कार्यक्रमाला विश्वविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, शिक्षकेतर सहकारी, नागपूर व रामटेक येथील पत्राकार इ उपस्थित होते. परीक्षा विभागाने परीक्षा नियंत्रक डाॅ. केशव मोहरीर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली परीक्षा विभागातील सर्व सहका-यांच्या सक्रीय सहकार्याने समारंभ यशस्वीरित्या संपन्न झाला. दीक्षांत समारोह श्री राजीवरंजन मिश्रा, विभाग प्रमुख, महर्षी पाणिनी संगणक केंद्रयांचे मोलाचे सहकार्य लाभले दीक्षांत समारोह महत्त्वपूर्ण उपलब्धी सर्वाधिक पदके व मा. कुलपती सुवर्णपदक - एम.ए. आचार्य (संस्कृत) विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल तसेच आणि सर्व विद्याशाखांमधून सर्वप्रथम आल्याबददल सिमरन रवींद्र ठाकूर (2023-24) या विद्यार्थिनीला सर्वाधिक पदके - 9 सुवर्ण पदके व 1 रोख पारितोषिक प्रदान करण्यात आली. मा. राज्यपाल यांच्याद्वारे प्रदान करण्यात येणारे मा. राज्यपाल आणि विश्वविद्यालयाचे कुलपती यांच्याद्वारे देण्यात येणारे कुलपती सुवर्णपदक आचार्य (एम्. ए). (संस्कृत) मध्ये सर्वाधिक गुण अर्थात् प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या सिमरन रवींद्र ठाकूर (23-24) हिला प्रदान करण्यात आले. सर्वोत्तम अष्टपैलू विद्यार्थी सुवर्णपदक - विश्वविद्यालयाच्या रामटेक, वारंगा व रत्नागिरी या परिसरातून सर्वस्तरीय सर्वोत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करणा-या विद्यार्थ्याला देण्यात येणारे श्री समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ स्मृती सुवर्णपदक 2023-24 करिता कृतिका रितेश जैन हिला प्रदान करण्यात आले. याशिवाय सम्मानित शास्त्री परीक्षेत सर्व संकायांमधून सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दलही कृतिका जैन हिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. सर्वोत्तम प्रबंधाचे पारितोषिक - यां वेदविद्या संकाया मधून रवी गोपाल भट , संस्कृत तथा संस्कृतेतर भाषा संकाया मधून देवकृष्ण बापुलाल ठाकोर, भारतीय धर्म, तत्त्वज्ञान तथा संस्कृती संकायामधून विद्या दिनेश लांजेवार, शिक्षणशास्त्र तथा संकीर्ण विद्याशाखा संकायामधून राजेश रमेश अक्केवार, प्राचीन भारतीय विज्ञान तथा मानव्यशास्त्रे मधून कल्याणी दिनकर डहाळे यांच्या सर्वाेत्तम 5 प्रबंधांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. प्रथम स्थान प्राप्त गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे गोपाल शर्मा या विद्यार्थ्याला एम्.ए. (वेद) (गुरुकुलम्)मध्ये, व चिन्मय शैलेश मुंजे याने आचार्य एम्. ए. (दर्शन) मध्ये सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबददल,एम्.ए. (योगशास्त्रामध्ये)े वेणुगोपालकृष्णन सुदर्शना, एम्.पी. ए. (नृत्यशास्त्रामध्ये) प्रेमकुमार नीती, एम्.ए संस्कृत मध्ये शंकर बोख्या वसावे, एम्.एस्सी.(योगिक सायन्स मध्ये) मेधा गिरिश करमळकर, एम्.ए. (ज्योतिर्विज्ञान मध्ये) नीता मिलिंद नेवाळकर, एम्.ए (हिंदू अध्ययन मध्ये) वसुधा विनोद क्षीरसागर, एम्.एड्. (शिक्षाशास्त्र पारंगत) मध्ये हर्षाली विश्वेश्वर आवटे या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे प्रथम आल्याबद्दल पदक व पारितोषिके प्रदान करण्यात आली. बी.ए. (विशारद) मध्ये मेघना उदय गिरधारी, बी.ए. (योगशास्त्र) मध्ये विनय वासुदेव साने, बी.ए. (कीर्तनशास्त्र) मध्ये सोनिया चमन गजभिये, बी. पी. ए. (नृत्यशास्त्र) मध्ये प्रशिता मेहुल सुराना, बी.एफ्.ए. (उपयोजित कला) मध्ये वैभवी मनोज ढाले, बी.ए. (वेदंाग ज्योतिष) मध्ये दीपाली सुरेंद्रनाथ शहा, बी.ए. (सिव्हील सव्र्हिसेस) आणि (मागासवर्गीय विद्याथ्र्यांमधून प्रथम) अशा दोन्ही संवर्गात सिद्धार्थ सुखदेव साखरे, बी.एस्सी. (हाॅस्पिटॅलिटी स्टडीज्) मध्ये तेजल प्रकाश कदम यांना पदके व पारितोषिके प्रदान करण्यात येतील. प्राक्शास्त्री परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्रचिती प्रवीणराव वखरे हिला सन्मानपदक प्रदान करण्यात आली.  बी. एड्. शिक्षाशास्त्री पदवी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबददल ओंकार प्रमोद काळे तसेच मुलींमधून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबददल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक प्राप्त .
केल्याबददल किरण कन्हैया पवार यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. मुक्तस्वाध्यायपीठम् Centre for Distance & Online Education द्वारे परिचालित एम्.ए. (संस्कृत) विषयात सर्वाधिक गुण प्राप्त वैशाली विजय कोदे आणि एम्.ए. (योगशास्त्र) परीक्षेत रवीना नागेश दळवी यांना कुलगुरू पदक प्रदान करण्यात आले.