नागपूर, दिनांक . ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी येथे स्वयंभू गणेश मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भूमिपूजन सोहळा भव्य उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री रणजीतबाबू देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्यात आमदार डॉ आशिषराव देशमुख यांची मुख्य उपस्थिती लाभली. सौ रूपाताई रणजीतबाबू देशमुख व डॉ आयुश्री आशिषराव देशमुख यावेळी उपस्थित होत्या. जननेता आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांतून या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एकूण ₹६ कोटी निधी मंजूर झाला असून विकासकामांना सुरुवात झाली आहे. या उपक्रमामुळे मंदिर परिसराला नवचैतन्य लाभून भाविकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
स्वयंभू गणेशाची ही मूर्ती प्राचीन असून गणेशकुंडातून प्रकट झाल्याचा ऐतिहासिक उल्लेख आहे. दरवर्षी श्रावण मासात सात दिवसांचा अखंड हरीनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. विविध धर्मीयांचा सहभाग असल्याने हे देवस्थान सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.
मंदिराचा सुयोग्य आराखडा आणि भाविकांच्या सुविधांचा विचार करून या कामाचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी डॉ आयुश्री आशिषराव देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस त्यांनी मंदिर परिसराच्या विकास आराखड्याचे प्रभावी सादरीकरण केले.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार डॉ देशमुख म्हणाले पाटणसावंगी माझ्यासाठी कुटुंबाप्रमाणे आहे. घर चलो अभियानांतर्गत मी येथे मुक्काम करून लोकांच्या समस्या समजून घेतल्या व वचन दिलेल्या सर्व विकासकामांना सुरुवात केली आहे. केवळ १० महिन्यांत पाटणसावंगीमध्ये १० कोटींची विकासकामे आणली असून ग्रामिण रुग्णालय वाचनालय, पुरसंरक्षक भिंत, स्मशानभूमी विकास तसेच घरकुल योजनेतून अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
या मंदिराच्या पुनरुत्थानानंतर नागपूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गणेश मंदिर म्हणून पाटणसावंगीची ओळख निर्माण होईल व धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. सावनेर-कळमेश्वरचा विकास साधत आपल्या पालकांनी पाहिलेल्या प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास अशोक धोटे सुरेंद्र शेंडे अशोक
तांदूळकर किशोर मुसळे उज्ज्वल कराडभाजने प्रमोद पिंपळे अनंता पडाळ रविजी हटकर विलास ठाकरे अर्पितजी काकानी यांसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण व शिस्तबद्धपणे पार पडले.