नागपूर,दिनांक.8 मे 2026:- केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित देशातील पहिल्या ठरलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे आठवे पर्व यंदा 31 मे ते 7 जून 2026 या कालावधीत नागपूर शहरात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक आमदार संदीप जोशी यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी श्री. सुधीरजी दिवे, सहसंयोजक डॉ. पियूष आंबुलकर उपस्थित होते.
दरवर्षी हा महोत्सव नागपूर शहर व जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात पार पडत आला आहे. मात्र यावर्षी नागपुरातील वाढते तापमान लक्षात घेता क्रीडा साखळी खंडित न करता महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला असून, यंदा हा महोत्सव फक्त नागपूर शहरातील खेळाडूंकरिता मर्यादित ठेवण्यात आला आहे.या पर्वात एकूण 18 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला असून, शहरातील विविध भागांतील सुमारे 20 मैदानांवर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे सर्व मैदानी स्पर्धा रात्रीच्या सत्रात आयोजित केल्या जाणार आहेत. या महोत्सवासाठी एकूण 57 लाख 63 हजार रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली असून विजेत्यांना ट्रॉफी व पदकेही प्रदान करण्यात येणार आहेत.
या महोत्सवात कुस्ती, मॅरेथॉन, खो-खो, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, कबड्डी, स्विमिंग, बास्केटबॉल, बुद्धिबळ (चेस), कॅरम, हँडबॉल, योगासन, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग, टेबलटेनिस आणि सॉफ्टबॉल या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. पियुष आंबुलकर, डॉ. पद्माकर चारमोडे, सचिन देशमुख, अशफाक शेख, डॉ. विवेक अवसरे, डॉ. संभाजी भोसले, अमित संपत, नागेश सहारे, नवनीत तुली, सचिन माथने विशाल लोखंडे, संदेश खरे, लक्ष्मीकांत किरपाने, धनंजय उपासनी, सतीश वडे, सुनील मानेकर, डॉ. सौरभ मोहोड, प्रकाश चंद्रायाण आणि नीरज दोन्तुलवार हे सहसंयोजक म्हणून जबाबदारी सांभाळणार असल्याची माहिती आमदार जोशी यांनी दिली.
पत्रपरिषदेला खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक आ. संदीप जोशी यांच्या सह सर्व क्रीडा समन्वयकांनी सहसंयोजक उपस्थित होते.