नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

डॉक्टर्स डेनिमित्त डॉक्टरांचा सत्कार

राष्ट्रीय डॉक्टर्स डेचे औचित्य साधून भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी व अथर्व पब्लिकेशन्स यांच्यातर्फे गुरुवारी -1 जुलै शहरातील नामवंत डॉक्टरांचा हृदय सत्कार करण्यात आला

डॉक्टर्स डेनिमित्त डॉक्टरांचा हृद्य सत्कार जळगाव ः राष्ट्रीय डॉक्टर्स डेचे औचित्य साधून भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी व अथर्व पब्लिकेशन्स यांच्यातर्फे गुरुवारी (1 जुलै) शहरातील नामवंत डॉक्टरांचा हृदय सत्कार करण्यात आला, कोविड-19 च्या महामारीत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता रुग्णांना अहोरात्र समर्पित सेवा देणार्‍या डॉक्टरांप्रति कृतज्ञता व्यक्त करणे आपले संविधानिक व संस्कृतिपर कर्तव्य आहे. आपल्यामुळे संसर्ग होऊन कुटुंब धोक्यात येईल, ही अनाठायी भीती न बाळगता सेवेला प्राधान्य देत रुग्णांना यथोचित उपचारांनी कोविडमुक्त करून जीवनाचे सार्थक मानणार्‍या डॉक्टरांप्रति उतराई होण्यासाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी व अथर्व पब्लिकेशन यांच्यातर्फे शासकीय निर्बंध पाळत सार्वजनिक कार्यक्रम न ठेवता कालोचित प्रत्येक डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन व्यक्तिशः शाल, श्रीफळ व वाचनीय पुस्तके देऊन डॉक्टरांचा हृद्य सत्कार करण्यात आला. सत्कार अभियानाचा शुभारंभ प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या क्लिनिकपासून करण्यात आला. प्रारंभी संयोजक विजय लुल्हे यांनी प्रस्तावनेत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी प्रभू धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले. रुग्णांना सेवा देताना तथा कर्तव्य बजावताना निधन झालेल्या कोरोनायोद्धा डॉक्टरांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जीवघेण्या म्युकरमायकोसिस या नेत्रविकारासंदर्भात शासनाला जाग आणून देत जनप्रबोधन करणारे डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या सन्मानार्थ दृष्टिदाता हे पुस्तक देऊन श्री. लुल्हे यांनी सत्कार करून डॉक्टर्स दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दीपक महाले उपस्थित होते. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी, मालती अ‍ॅक्सिडंट हॉस्पिटलचे डॉ. प्रताप जाधव, स्पर्श फिजिओथेरपी सेंटरचे डॉ. गजानन पाटील, नाक-कान-घसातज्ज्ञ डॉ. देविदास सरोदे यांचा सत्कार केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष निळकंठ गायकवाड यांनी केला. प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ तथा योगशिक्षिका सौ. तिलोत्तमा गाजरे यांचा सत्कार चित्रकार सुनील दाभाडे यांनी केला. राज्य शासनाचा वनश्री पुरस्कारप्राप्त डॉ. सौ. रेखा महाजन यांचा सत्कार कुमुद पब्लिकेशन्सच्या संचालिका संगीता माळी यांनी शाल, श्रीफळ व श्यामची आई कादंबरी देऊन केला. आर्यन इको रिसॉर्टचे संचालक डॉ. रवी महाजन यांचा सत्कार प्रसिद्ध आर्किटेक्ट प्रमोद महाजन यांनी केला. न्यूरोसर्जन डॉ. राजेश डाबी यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार दीपक महाले यांनी केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचा सत्कार विजय लुल्हे यांनी केला, तसेच कोविड-19 नमुना संकलन टीमच्या डॉ. अनुराधाताई वानखडे, डॉ. राखी यादव, डॉ. सतीश सुरळकर यांच्यासह स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक तथा मनोचिकित्सातज्ज्ञ डॉ. नीरज देव व सौ. रम्याई देव, दृष्टी हॉस्पिटलचे नेत्रतज्ज्ञ डॉ.उल्हास कोल्हे, दत्त नर्सिंग होमचे डॉ. संजय महाजन यांचा सत्कार विजय लुल्हे यांनी केला. डॉ. बी. डी. सुतार यांचा सत्कार आदर्श शिक्षिका सौ. उषा सोनार यांनी केला. भूलतज्ज्ञ डॉ. संपत वानखेडे यांचा सत्कार ग्रेडेड मुख्याध्यापक बाळकृष्ण ठोसरे, न्यूरोसर्जन डॉ. प्रशांत साठे यांचा सत्कार पत्रकार किशोर शिंपी यांनी केला. डॉक्टर्स डेच्या सत्कार उपक्रमासाठी पुस्तक भिशी संस्थापक मार्गदर्शक तथा निवृत्त शिक्षण उपसंचालक प्राथमिक कवी लेखक शशिकांत हिंगोणेकर, निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, अथर्व पब्लिकेशन्सचे संचालक युवराज माळी, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, के. प्र. कवी अरुण वांद्रे, विशाखा देशमुख यांचे सहकार्य लाभले.(दि.03/07/2021)