नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

उपराजधानीत प्लास्टिक सर्जरीतून लिंगाची पुनर्रचना - लता मंगेशकर रुग्णालयात गुंतागुंतीची पहिली शस्त्रक्रिया

नागपुरातील लता मंगेशकर रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन डॉक्टरांच्या चमूने गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेतून लिंगाची पुनर्रचना करत या रुग्णाला दिलासा दिला

नागपूर दि.2 जुलै 2025 :- राजस्थानच्या एका ४० वर्षीय तरुणाने कर्करोगामुळे आठ वर्षांपूर्वी लिंग गमावले होते. परंतु नागपुरातील लता मंगेशकर रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन डॉक्टरांच्या चमूने गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेतून लिंगाची पुनर्रचना करत या रुग्णाला दिलासा दिला आहे. मध्य भारतातील या पद्धतीची ही पहिली शस्त्रक्रिया असल्याचा डॉक्टरांचा दावा आहे. कर्करोगाने लिंग गमवावे लागलेल्या तरुणाला लिंग गमावल्यावर बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत होता. त्याला नागपुरातील लता मंगेशकर रुग्णालयातील प्लास्टिक सर्जनच्या चमूबाबतची माहिती कळाली. त्यानंतर तो उपचारासाठी येथे आला. लता मंगेशकर रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन तज्ज्ञांच्या चमूने या तरुणाचे कृत्रिम लिंग तयार करून गुंतागुंतीच्या दुर्मिळ शस्त्रक्रियेतून यशस्वीरित्या रुग्णात बसवले. मध्य भारतातील या पद्धतीची ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा रुग्णालय प्रशासनाचा दावा आहे. ही संपूर्ण शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या चमूला पूर्ण करण्यासाठी तब्बल ९.५ तास लागले. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या नेतृत्वात डॉ. जितेंद्र मेहता, डॉ. समीर महाकाळकर, डॉ. अश्विनी पंडितराव, डॉ. देव पटेल, डॉ.अभिराम मुंडले, डॉ. कंवरबीर, डॉ. पल्लवी या चमूने ही कामगिरी पार पाडली. डॉ. अंजली भुरे, डॉ. मधुश्री शहा, डॉ. केतकी मारोडकर, डॉ. रचना नैताम, डॉ. गुंजन यांनी या प्रक्रियेसाठी बधिरीकरणाचे काम केले. वैद्यकीय अधिक्षक व उपअधिष्ठाता डॉ. नितीन देवस्थळे यांनी रुग्णालय स्तरावरील सर्व मदत केली. शस्त्रक्रियेतून रुग्ण पूर्ण बरा झाला आहे. आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या सरकारी योजनांतर्गत हिंगणा येथील लता मंगेशकर हॉस्पीटल येथे उपचार व शस्त्रक्रिया नि:शुल्क केली जाते !.. अशी झाली शस्त्रक्रिया... तरुण रुग्णाच्या लिंगाच्या रचनेसाठी, रुग्णाच्या हाताच्या वरच्या बाजूला शाफ्ट आणि मूत्रमार्ग (मूत्रमार्गाची नळी) पुनर्बांधणी करण्यात आली. त्यानंतर जघन भागात लावण्यात आले. लिंगात रक्तपुरवठा करणे, नसांमध्ये पूर्ण संवेदना प्रदान करणे आणि एक कार्यशील अवयव निर्माण करण्यासाठी सूक्ष्म रक्तवाहिन्या जोडणे या बाबींचा
समावेश या शस्त्रक्रियेमध्ये होता. अशा शस्त्रक्रियांना मायक्रोव्हस्क्युलर शस्त्रक्रिया म्हणतात. यासाठी आवश्यक असलेला अत्याधुनिक ऑपरेटिव्ह मायक्रोस्कोप लता मंगेशकर हॉस्पीटल येथे उपलब्ध असल्याने ही शस्त्रक्रिया होऊ शकली.