नागपूर, ता. 14 मे 2026 : अखिल भारतीय रेल्वेमेन्स फेडरेशन (AIRF) यांच्या पुढाकाराने 15 मे 2026 रोजी नागपुरात अखिल भारतीय रनिंग स्टाफ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे आयोजन नॅशनल रेल्वे मजदूर युनियन [NRMU (CR/KR)] तर्फे महासचिव कॉम्रेड वेणू पी. नायर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत असून परिषद सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.
भारतीय रेल्वेमधील रनिंग स्टाफ कर्मचाऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या वाढत्या समस्या, कामाच्या कठीण परिस्थिती, सुरक्षा विषयक आव्हाने तसेच कर्मचारी कल्याणाशी संबंधित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ही परिषद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. देशभरातील विविध रेल्वे झोन आणि विभागांमधून शेकडो रनिंग स्टाफ प्रतिनिधी या परिषदेस उपस्थित राहणार आहेत. परिषदेत AIRF चे महासचिव कॉम्रेड शिवगोपाल मिश्रा यांच्यासह विविध झोनमधील प्रमुख नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. रेल्वे रनिंग स्टाफमध्ये लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट ट्रेन मॅनेजर तसेच मेल-एक्सप्रेस मालगाड्या EMU/MEMU सेवा आणि वंदे भारत राजधानी शताब्दी दुरांतोसारख्या वेगवान गाड्यांमध्ये कार्यरत कर्मचारी यांचा समावेश होतो. हे कर्मचारी देशातील रेल्वे वाहतूक व्यवस्था सुरक्षित, वेळेवर आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. या परिषदेत सुमारे 14 महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात येणार असून त्यामध्ये रनिंग स्टाफच्या कामाच्या अटी व विश्रांती सुविधा सुधारणा रिक्त पदे भरणे सुरक्षा मानके मजबूत करणे क्रू लॉबी सुविधा वाढवणे रनिंग अलाउन्समधील विसंगती दूर करणे, मानसिक ताण कमी करण्यासाठी उपाययोजना आरोग्य व कल्याण सुविधा पदोन्नती संधी निवृत्तीवेतनाशी संबंधित प्रश्न आणि प्रलंबित तक्रारींच्या निवारणासाठी संयुक्त आंदोलनाची आखणी यांसारख्या विषयांचा समावेश असेल.
या परिषदेमुळे रेल्वे प्रशासनाचे लक्ष रनिंग स्टाफच्या समस्यांकडे वेधले जाईल तसेच कर्मचारी कल्याण रेल्वे सुरक्षा आणि भारतीय रेल्वे व्यवस्थेच्या बळकटीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.