नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चला अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च हे नाव देण्यास युजीसीची मंजुरी

दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (डीएमआयएचईआर)ला अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च हे नवीन नाव स्वीकारण्यासाठी युजीसीची मंजुरी मिळाली आहे

नागपूर दिनांक.27 सप्टेंबर 2026:- दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (डीएमआयएचईआर)ला अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च हे नवीन नाव स्वीकारण्यासाठी युजीसीची मंजुरी मिळाली आहे. स्वर्गीय श्री. दत्ताजी मेघे यांनी 1990 मध्ये या संस्थेची स्थापना केली. वैद्यकीय महाविद्यालयापासून सुरू झालेली ही संस्था आज वर्धा आणि नागपूर येथे कॅम्पस असलेले बहुविषयक विद्यापीठ म्हणून विकसित झाली आहे. या नव्या नावामुळे अदाणी फाउंडेशन आणि दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च यांच्यातील सहकार्याला नवी दिशा मिळणार आहे. या सहकार्याच्या माध्यमातून परवडणारे आरोग्य शिक्षण आणि आरोग्यसेवा यासाठी जागतिक स्तरावरील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.नागपूर (महाराष्ट्र) 26 सप्टेंबर 2026: दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च (डीएमआयएचईआर), अभिमत विद्यापीठाला आता अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च असे नवीन नाव देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) कडून मंजुरी मिळाली आहे. व्हाईस चान्सलर डॉ. ललितभूषण वाघमारे यांनी सांगितले हा आमच्या संस्थेसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च या नव्या नावाने पुढे जाताना आम्ही मजबूत पायावर उभारलेली ही वाटचाल पुढे नेणार आहोत. तसेच उत्कृष्टता, नवकल्पना आणि जागतिक स्तरावर काम करण्याच्या अधिक संधी निर्माण करणार आहोत. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या संस्थेला दिशा देणारी मूल्ये आणि उद्देश यापुढेही आमच्या कामाच्या केंद्रस्थानी राहतील ते पुढे म्हणाले, दर्जेदार शिक्षण आणि संवेदनशील आरोग्यसेवा देण्याची आमची बांधिलकी कायम राहील. विशेषतः ग्रामीण आणि आरोग्यसेवेपासून वंचित असलेल्या समुदायांसाठी काम करण्यावर आमचा भर कायम असेल. संशोधन अधिक मजबूत करणे, नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आणि विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, रुग्ण तसेच समाजातील विविध घटकांसाठी अधिक संधी निर्माण करणे, यासाठी आम्ही पुढे काम करू.चीफ सर्व्हिसेस ऑफिसर (CSO) श्री. रवींद्र मेहेरे यांनीही पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शैक्षणिक उत्कृष्टता, आरोग्यसेवा, संशोधन आणि समाजाप्रती असलेली संस्थेची बांधिलकी यावर प्रकाश टाकला.या संस्थेची सुरुवात 1990 मध्ये महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील सावंगी (मेघे) येथे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज (जेएनएमसी)च्या स्थापनेपासून झाली. संस्थेचे संस्थापक आणि माजी कुलपती श्री. दत्ताजी मेघे यांनी ही संस्था सुरू केली. चार वेळा खासदार राहिलेले आणि विदर्भातील शिक्षण व आरोग्यसेवेसाठी दीर्घकाळ काम करणारे श्री. मेघे यांनी या संस्थेचा वैद्यकीय महाविद्यालयापासून मल्टीडिसिप्लिनरी विद्यापीठापर्यंत विस्तार केला. आज येथे वैद्यकीय शिक्षणासोबतच दंतचिकित्सा नर्सिंग आयुर्वेद फिजिओथेरपी, फार्मसी, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या क्षेत्रांमध्येही शिक्षण दिले जाते. श्री. दत्ताजी मेघे यांचे 22 मार्च 2026 रोजी वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. विदर्भातील शिक्षण आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील त्यांचे योगदान त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेसाठी आजही महत्त्वाचे आहे.चान्सलर डॉ. प्रीती अदाणी या संस्थेच्या या नव्या टप्प्यात नेतृत्व करत आहेत.24 मे 2005 रोजी युजीसीने या संस्थेला अभिमत विद्यापीठ’ (डीम्ड-टू-बी-यूनिवर्सिटी) असा दर्जा दिला. संस्थेच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा होता.गेल्या काही वर्षांत वर्धा आणि नागपूर येथे संस्थेने शिक्षण आणि आरोग्यसेवेचे मोठे नेटवर्क उभारले आहे. शिक्षण संशोधन रुग्णसेवा आणि सामुदायिक आरोग्य या क्षेत्रांत संस्थेने उल्लेखनीय काम केले आहे. संस्थेच्या सामाजिक उपक्रमांमध्ये आरोग्य वारी, महा आरोग्य शिबिरे आणि आरोग्य अमृत महोत्सव यांचा समावेश आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून कॅम्पसच्या बाहेरील नागरिकांपर्यंतही आरोग्यसेवा पोहोचवली जाते. संस्थेने आपल्या शैक्षणिक विस्तारालाही चालना दिली असून, नुकतेच नागपूरमधील वानाडोंगरी येथे दत्ता मेघे डेंटल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सुरू करण्यात आले आहे.हा बदल जून 2025 मध्ये डीएमआयएचईआर आणि अदाणी फाउंडेशनने जाहीर केलेल्या सहकार्यावर आधारित आहे. अदाणी फाउंडेशन हे अदाणी समूहाच्या सामाजिक कल्याण आणि विकासासाठी काम करणारे संस्थान आहे. या भागीदारीचा उद्देश डीएमआयएचईआरला परवडणारे आरोग्य शिक्षण आणि आरोग्यसेवा देण्यासाठी जागतिक स्तरावरील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) म्हणून विकसित करणे हा आहे. विद्यापीठातील शैक्षणिक अभ्यासक्रम शिक्षकवर्ग कॅम्पस आणि प्रशासनाचे कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहणार आहे. तीन दशकांहून अधिक काळात उभारलेल्या शैक्षणिक, वैद्यकीय आणि सामाजिक कार्याच्या मजबूत पायावर संस्थेचा हा नवा टप्पा पुढे नेला जाणार आहे.अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च या नव्या नावाने संस्था
श्री. दत्ताजी मेघे यांनी शिक्षण आणि आरोग्यसेवेसाठी दिलेले योगदान पुढे घेऊन जाणार आहे. तसेच संशोधन, नवकल्पना आणि दर्जेदार आरोग्य शिक्षण अधिक व्यापक स्तरावर उपलब्ध करून देण्यासाठी नव्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत .